विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेंनी बुलढाण्यातही जोपासला "सभापती धर्म"! आ.गायकवाड, विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे... तिन्ही घरी घेतल्या भेटी...
Jun 4, 2026, 17:21 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आज बुलढाण्यात आले होते. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने बुलढाण्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाण्यात आलेल्या ना.शिंदे यांनी कार्यक्रमानंतर "सर्व पक्ष समभाव" दाखवला.. आपसात न पटणाऱ्या तिन्ही नेत्यांच्या घरी –दारी त्यांनी भेटी दिल्या.
बुलढाण्याच्या संगम चौकात आयोजित कार्यक्रमात मंचावर प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह आमदार संजय गायकवाड, माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, भाजप नेते योगेंद्र गोडे, भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ उपस्थित होते. आ.गायकवाड, विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे यांचे आपसात काही पटत नाही हे सर्वश्रुत आहे..त्यामुळे मंचावर तिघेही अंतर राखून बसले होते.. मात्र राम शिंदे तिघांशीही बोलले..विशेष म्हणजे कार्यक्रम आटोपल्यावर आधी आ.गायकवाडांचे संपर्क कार्यालय, त्यांनतर योगेंद्र गोडे यांचे निवासस्थान आणि शेवटी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे अशा तिन्ही ठिकाणी ना.शिंदे यांनी चहापान केले...तुमचं काहीही असलं तरी मला मात्र सर्वजण सारखेच हा "सभापती धर्म" प्रा. राम शिंदे यांनी बुलढाण्यातही जोपासला...