बुलढाण्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त ‘एकात्म मानवदर्शन’ विषयावर व्याख्यानांचे आयोजन; डॉ. विवेक संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Sep 27, 2025, 12:47 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील आयटीआय संस्था व तालुक्यातील सव येथील विवेकानंद विद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून डॉ. विवेक संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या प्रेरणादायी व्याख्यानात डॉ. पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारसरणीचा परिचय करून देत ‘एकात्म मानवदर्शन’ या भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेल्या तत्त्वज्ञानाची सविस्तर मांडणी केली. भांडवलशाही व साम्यवादाचा समतोल, शरीर-मन-बुद्धी-आत्मा यांचा संतुलित विकास, अर्थ-काम-धर्म-मोक्ष या पुरुषार्थांचे महत्त्व तसेच ‘अंत्योदय’ ही उपाध्यायजींनी दिलेली संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार सोप्या व चित्रमय पद्धतीने हे तत्त्वज्ञान समजावून सांगताना २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वदेशीचा अवलंब व युवा पिढीचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
आयटीआय आणि विवेकानंद विद्यालय या दोन्ही ठिकाणी मिळून हजारो विद्यार्थी उपस्थित राहिले. प्राचार्यांनी प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले.