सोडा हो सोडा.. खडकपूर्णा प्रकल्पातून कालव्यात पाणी सोडा! खरीप हातचा गेला ,आता का रब्बी पण जाऊ देता? माजी आ.शशिकांत खेडेकर संतापले...

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव महीजवळील संत चोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्प शंभर टक्के भरलेला असतानाही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे रब्बी हंगामावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. याबाबत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत डाव्या आणि उजव्या कालव्यांतून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची शेवटची आशा रब्बी हंगामावर होती. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड झाली आणि उगवणही चांगली झाली. मात्र सध्या सिंचनाचा तुटवडा असल्याने उभ्या पिकांना करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. बळीराजा चिंतेत असून तात्काळ पाण्याची गरज भासत आहे.
संत चोखासागर प्रकल्प भरून वाहत असतानाही पाणीवाटपाचे नियोजन झालेले नाही. रोटेशन, पिकांचे नियोजन आणि पाण्याचा वापर याबाबत कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक ऑक्टोबरमध्ये व्हायला हवी होती; परंतु नोव्हेंबर संपूनही कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
 
रब्बी हंगाम हातचा जाण्याची भीती व्यक्त
‘खरीप हंगाम पावसाळ्यातच बुडाला आणि आता रब्बी पिकेही पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासन जबाबदारी टाळत आहे, पण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार कोण,’ असा सवाल डॉ. खेडेकर यांनी निवेदनातून केला. प्रकल्प शंभर टक्के भरलेला असूनही पाणीवाटपाचे नियोजन न झाल्याची त्यांनी टीका केली.
पाटबंधारे विभाग प्रकल्पाकडे, तर प्रकल्प अधिकारी हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर बोट ठेवतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे रब्बी पिके वाचवण्यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.