उद्यापासून लोणारच्या १००० वर्ष जुन्या दैत्यसूदन मंदिरात किरणोत्सव; सूर्यकिरणांनी होणार मूर्तीचा नैसर्गिक अभिषेक!
Updated: May 15, 2025, 14:14 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार शहरातील हजारो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेले दैत्यसूदन मंदिर पुन्हा एकदा पर्यटकांच्या आणि भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. कारण, दि. १६ मे शुक्रवारपासून सलग पाच दिवस येथे भव्य किरणोत्सव अनुभवायला मिळणार आहे.
भगवान विष्णूंच्या दैत्यसूदन अवताराला समर्पित असलेल्या या प्राचीन मंदिराची कोरीव कलाकुसर थेट कोनार्कच्या सूर्य मंदिराशी मिळती-जुळती आहे. हे मंदिर सुमारे १००० वर्षे जुने असून शहराचा सांस्कृतिक ठेवा मानले जाते.
याठिकाणी दरवर्षी विशिष्ट काळात सूर्यकिरण मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करून दैत्यसूदन मूर्तीवर थेट अभिषेक करतात, ही एक प्राचीन स्थापत्यशास्त्रीय कमाल आहे.
१६ मे ते २० मे दरम्यान, दररोज सकाळी ११:३० ते दुपारी १ या वेळेत सूर्यकिरण मूर्तीवर थेट पडताना भाविक पाहणार आहेत. या अद्वितीय क्षणांना अनुभवण्यासाठी भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने मंदिरात येण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने लोणार शहरात पर्यटनासही चांगली चालना मिळणार आहे.
स्थानिक रवी जावळे यांच्या परिवाराकडून सर्व भक्तांसाठी लाडवांचा प्रसाद ठेवण्यात आला आहे. भाविकांनी पुरातत्त्व विभागाकडे पिण्याचे पाणी, सावली आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
आतापर्यंत फारशी प्रसिद्धी न मिळालेला हा किरणोत्सव मागील काही वर्षांत भाविक आणि पर्यटकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे. यावर्षी पुन्हा एकदा सूर्यकिरणांचा हा अद्वितीय सोहळा पाहण्याची संधी उद्यापासून मिळणार असून, लोणारवासीयांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.