विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुढाकार! ८ ते २० जून दरम्यान स्कूल बसेसची होणार तपासणी! नियमांचे पालन न करणाऱ्यांवर होणार कारवाई...

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पालक आपल्या लेकरांना स्कूल बसने शाळेत पाठवतात.. पण या बसेस नियमांचे पालन करतात का? तुमचे लेकरू सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच ना... तर आता शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी खामगावच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे... यात नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल..!

८ ते २० जून दरम्यान खामगाव उपप्रादेशिक विभागाने एक विशेष मोहिमाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागातील सर्वच स्कूल बसेसची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी सर्व स्कूल बस चालक-मालक व शैक्षणिक संस्थांनी शाळा स्तरीय स्कूलबस सुरक्षितता समितीशी संपर्क साधावा किंवा खामगावच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे फेर तपासणी करून घ्यावी असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

उच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबसांची फेर तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने बसची तांत्रिक तपासणी, सुरक्षा साधनांची उपलब्धता तसेच नियमांचे पालन याची खात्री जमा करण्यात येईल. स्कूलबसेसची फेर तपासणी पूर्ण झाल्या नंतरच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार आहे. १ जुलै २०२६ नंतर फेर तपासणी न केलेल्या स्कूल बसेस विरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा खामगावच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.