बुलडाणा बसस्थानक मधील हनुमान मंदिराजवळ मोटरसायकल ठेवताय? आधी ही बातमी वाचा.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा बसस्थानकात असलेल्या हनुमान मंदिराजवळ उभी असलेली मोटरसायकल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 बुलडाणा शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. चोरीच्या घटनांच्या तुलनेत तपासाचा वेग मात्र कमी असल्याची बाब निदर्शनास येत आहे. बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवर राहणारे संतोष रामचंद्र अक्कर (४१) हे बुलडाणा बस स्टॅन्ड वरील कॅन्टीन मध्ये मजुरीचे काम करतात. त्यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची लाल रंगाची मोटरसायकल ( एम एच २८, एफ ३५२७) बस स्टॅन्ड मधील हनुमान मंदिराजवळ लावली होती. घटनेच्या दिवशी दुपारी ११ वाजेच्या सुमारास कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या माधव नावाच्या मुलाने त्यांना सांगितले की तुमची गाडी कोणीतरी घेऊन जात आहे. संतोष अक्कर यांनी कॅन्टीन च्या बाहेर येऊन पाहिले असता गाडी घेऊन जाणारा व्यक्ती गाडी घेऊन गायब झाला होता. बुलढाणा शहरात सर्वत्र शोध घेऊनही गाडी मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...