ज्ञानगंगा, अंबाबरवा आणि लोणार अभयारण्यात जंगल सफारी तीन महिन्यांसाठी बंद...का घेतला निर्णय? वाचा...

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार या अभयारण्यात येणाऱ्या जंगल सफारीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढील ९० दिवस जंगल सफारी बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्य तसेच खामगाव, बुलढाणा, मोताळा तालुक्यातील ज्ञानगंगा व लोणार अभयारण्यांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. मात्र, पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात, जंगलात गारवा व चिखलामुळे वाहनांची घसरगुंडी होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, वन्यजीवांची हालचालही वाढत असल्याने त्यांना त्रास होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून.
वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे की, या काळात अभयारण्यात कोणत्याही पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. जंगल सफारीसाठी उत्सुक पर्यटकांनी ही बाब लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
ही बंदी ९० दिवस कायम राहणार असून पावसाळ्यानंतर अभयारण्य पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येतील.