चिखलीत ‘जनता दरबार’चा दमदार प्रयोग; २७३ तक्रारींवर कारवाई, अधिकाऱ्यांना १ जूनची डेडलाईन
Updated: May 5, 2026, 10:20 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रशासकीय उदासीनतेला चाप लावत आमदार श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालय, चिखली येथे सोमवारी पार पडलेला ‘जनता दरबार’ नागरिकांसाठी दिलासादायक ठरला. विविध विभागांशी संबंधित तब्बल २७३ तक्रारींची नोंदणी झाली असून, यातील अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. उर्वरित प्रकरणे १ जून २०२६ पर्यंत निकाली काढण्याचे कडक आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सरकार नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे’ या सुशासन संकल्पनेला साजेसा हा उपक्रम ठरला. महसूल, पंचायत समिती आणि नगरपालिका विभागांच्या अधिकाऱ्यांची एकाच ठिकाणी उपस्थिती असल्याने नागरिकांना थेट आपली गाऱ्हाणी मांडता आली.
दरबारात महसूल विभागातील सातबारा उतारे, फेरफार नोंदणी, जमीन नोंदीतील त्रुटी यांसारख्या प्रलंबित प्रश्नांचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख झाला. पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) लाभापासून वंचित राहिलेल्यांनी आपली समस्या मांडली, तर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभधारकांनी थकीत अनुदानाबाबत तक्रारी केल्या. नगरपालिका चिखलीशी संबंधित पाणीपुरवठा, मालमत्ता कर, रस्ते दुरुस्ती आणि कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवरही नागरिकांनी आवाज उठवला.
या दरम्यान घरकुल योजनेसाठी काही ठिकाणी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. यावर आमदार श्वेता महाले पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ समोर बोलावून कठोर शब्दांत सुनावले. गरिबांच्या हक्काच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेतील थांबलेल्या हप्त्यांबाबत शेतकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना लाभ अखंडित मिळावा आणि बंद झालेले हप्ते तातडीने सुरू करावेत, असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि धावपळ वाचल्याची भावना व्यक्त होत असून प्रशासनाबद्दल विश्वास वाढल्याचे चित्र दिसून आले. “जनतेची सेवा हीच खरी जबाबदारी आहे, अधिकाऱ्यांची उदासीनता खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत आमदारांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत तहसील कार्यालय, चिखली येथे ‘जनता दरबार’ नियमितपणे आयोजित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पहिल्याच दरबाराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चिखली तालुक्यात सुशासनाची नवी परंपरा रुजत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.