भूमिमुक्त मोर्चाच्या वतीने बुलडाण्यात जेलभरो; आंदोलकांना ताब्यात घेऊन केले स्थानबद्ध..!
Jun 11, 2025, 18:28 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – महसूल व वन जमिनीवरील अधिकारासाठी भूमिमुक्त मोर्चाच्या वतीने आज दिनांक ११ जून रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रदीप अंभोरे यांनी केले.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे महसूल व वन जमिनीवरील पात्र व अपात्र दावेदारांना शासकीय जमिनीवर पेरणीपूर्व मशागत व पेरणी करण्याची परवानगी द्यावी, अतिक्रमित शेत जमिनीवर प्रस्तावित असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी, तसेच निवासी घरपट्टी कायम करावी.
याशिवाय, घरकुलासाठी मिळणारे अनुदान वाढवून अडीच लाख रुपये करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी एकजुटीने आंदोलन केले. प्रशासनाकडून आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपली मागणी मांडली असता, पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.