चिखली बाजार समितीत जय "बजरंगबली"! पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा... व्यापाऱ्यांचे स्वप्न झाले साकार
Apr 14, 2025, 08:01 IST
चिखली (प्रतिनिधी) : चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांच्या दीर्घकाळच्या इच्छेला मूर्त स्वरूप देत, १० एप्रिल रोजी पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. व्यापारी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास शर्मा यांच्या पुढाकारातून या मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समिती परिसरात एक हनुमान मंदिर असावे, अशी भावना व्यापाऱ्यांच्या मनात होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि अंमलबजावणीअभावी हे स्वप्न रखडले होते. कैलास शर्मा यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या विषयाला प्राधान्य दिले आणि व्यापाऱ्यांच्या एकजुटीच्या बळावर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली.
१० एप्रिल रोजी पारंपरिक धार्मिक विधी, वेद मंत्रोच्चार आणि पूजन यासह पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पार पडली. या प्रसंगी परिसरातील व्यापारी, नागरिक, महिला, बालक आणि हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे आयोजन अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आले होते.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वत्र समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून आले. हनुमान मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. या मंदिरामुळे बाजार समिती परिसर आता अधिक धार्मिक आणि पवित्र वाटतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
कैलास शर्मा आणि त्यांच्या टीमचे या कार्यासाठी सर्वत्र कौतुक होत असून, व्यापाऱ्यांच्या श्रद्धेचा एक नवा अध्याय यानिमित्ताने लिहिला गेला आहे.
आता चिखली बाजार समितीच्या आवारात असलेले हे पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील नागरिकांसाठी एक श्रद्धास्थान ठरणार आहे. भाविकांना आता याच ठिकाणी दररोज दर्शन घेता येणार असून, धार्मिक कार्यक्रमांसाठीही एक नवे केंद्र उपलब्ध झाले आहे.