एकाच क्लिकवर कर्ज प्रक्रियेची माहिती; अण्णासाहेब पाटील महामंडळाची ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा सुरू
May 15, 2026, 15:12 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांतील लाभार्थ्यांसाठी आता डिजिटल सुविधांचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. लाभार्थ्यांना अर्जाची स्थिती, कर्ज मंजुरी प्रक्रिया तसेच विविध योजनांची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी महामंडळाने अत्याधुनिक ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेचा शुभारंभ केला आहे. “One Click Information” या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे अर्जासंदर्भातील माहिती आता थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहे.
बुलढाणा जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ८९७६८५५९२१ या क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्यांसमोर विविध पर्यायांचा मेनू उपलब्ध होईल. यात महामंडळाच्या योजना, नवीन नोंदणी प्रक्रिया, पात्रता प्रमाणपत्राची स्थिती व डाउनलोड सुविधा, बँक कर्ज मंजुरीची माहिती तसेच व्याज परतावा दावा स्थिती यासारख्या सेवांचा समावेश आहे.
महामंडळाने या सेवेत सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले असून सर्व माहिती ओटीपी आधारित पडताळणीनंतरच उपलब्ध होणार आहे. याशिवाय अर्ज प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण व्हिडिओ, तसेच तांत्रिक अडचणी नोंदवण्यासाठी ‘तिकीट जनरेशन’ सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या डिजिटल उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या कार्यालयीन फेऱ्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि गतिमानता वाढणार आहे. परिणामी वेळ आणि खर्चाची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. महामंडळाने यापूर्वीच अधिकृत मोबाईल ॲप सुरू केले असून, व्यवसाय विस्तारासाठी संकेतस्थळावर ‘व्यवसायवर्धन’ टॅबही कार्यान्वित करण्यात आला आहे. भविष्यात ‘E-Market Place’ उभारण्याच्या दिशेनेही महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आगामी काळात थेट व्हॉट्सॲपवरूनच एल.ओ.आय. अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. सर्व लाभार्थ्यांनी या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.