मेहकर व लोणार तालुक्यांचा अतिवृष्टीग्र ग्रस्तांच्या यादीत समावेश करा,अन्यथा तीव्र आंदोलन— रविकांत तुपकर यांचा इशारा! रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी;
तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, 'क्रांतिकारी' चा आंदोलनाचा इशारा...
तुपकर यांनी सांगितले की, लोणार व मेहकर तालुक्यात गेल्या काही दिवसांत म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पूर्णपणे खरडून गेली असून सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून अनेक ठिकाणी शेतजमिनीवर दगडं,पाणी व गाळ साचल्याने पुढील पिकांच्या पेरण्या देखील धोक्यात आल्या आहेत.
रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर तीव्र निशाणा साधतांना सांगितले की, “राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २५३ तालुक्यांचा समावेश मदत पॅकेजमध्ये करण्यात आला आहे, मात्र उर्वरित १०५ तालुक्यांना अन्यायकारकरीत्या वगळण्यात आले आहे. हे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. लोणार व मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना या पॅकेजपासून वंचित ठेवणे हा सरकारचा अन्यायकारक निर्णय आहे.”
तुपकर यांनी पुढे इशारा दिला की,“जर मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश तात्काळ अतिवृष्टी ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये करण्यात आला नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन छेडेल. सरकारने या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.”
यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने प्रतिनिधी मंडळाचे निवेदन स्विकारून ते मुख्यमंत्री यांचेकडे पाठविण्याचे आश्वासन दिले व दोन्ही तालुके अतुवृष्टिग्रस्तांच्या यादीत घेण्याचा शब्द दिला.
निवडणूकीतील वचपा काढण्यासाठीच तालुके वगळले-तुपकर
लोकसभा निवडणूकीमध्ये या तालुक्यांमध्ये रविकांत तुपकर यांना भरघोस मतदान झाल्यामुळे व मंत्री प्रतापरावांना अपेक्षित मतदान न झाल्यामुळे तसेच राजकीय द्वेषभावनेतून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर व लोणार तालुक्यातील जनतेला अद्दल घडवण्यासाठीच या तालुक्यांना मदत पॅकेज मधुन वगळल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलतांना केला.अशा कठीण प्रसंगी शेतकरी अडचणीत असतांना सुध्दा सत्तेतील काही लोकांना राजकारण सुचत आहे हे दुर्दैवी आहे,सरकार काही तालुक्यांना वगळून रडीचा डाव खेळत आहे असेही तुपकर म्हणाले
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत. आता शासनाचा पुढील निर्णय काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी क्रांतिकारी चे पदाधिकारी सहदेव लाड, अमोल मोरे, नितीन सानप , देवीदास सरकटे , गजानन नाईकवाडे, गणेश अंभोरे,योगेश तुपकर, गजानन डिगोळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.