"जुलैत पावसाने विक्रम मोडला... पण आता ऑगस्टमध्ये मोठा 'ब्रेक'? हवामान विभागाच्या अंदाजाने बुलढाण्यातील शेतकऱ्यांची वाढली धाकधूक!"

 जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा १४.२ टक्के अधिक पाऊस; मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता, पीक नियोजनाबाबत तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जुलै महिन्यात दमदार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील पाणीसाठे, नद्या-नाले आणि शेतीला मोठा दिलासा दिला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा १४.२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असली, तरी ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार बुलढाणा जिल्हा पांढऱ्या-पिवळ्या संक्रमण पट्ट्यात येत असून, याचा अर्थ ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, महिनाभरात पावसाचे मोठे खंड पडण्याचीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जूनची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली. जून ते ३ ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पर्जन्यमानापेक्षा जवळपास १४.२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण पर्जन्यमान समाधानकारक असले, तरी त्याचे असमान वितरण आणि पुढील काळातील संभाव्य खंड हा शेतीसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.तज्ज्ञांच्या मते, हवामानाच्या रंगछटांवरून निश्चित निष्कर्ष काढणे योग्य नाही. पिवळा रंग कमी पावसाची शक्यता दर्शवितो, तर पांढरा रंग कमी, सामान्य किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचीही शक्यता दर्शवू शकतो. त्यामुळे स्थानिक हवामानातील बदलांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तातडीने आंतरमशागत करावी, शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच पावसाचा खंड लक्षात घेऊन सिंचन, खत व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रणाचे नियोजन करावे, असा सल्ला कृषी हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.ऑगस्टमध्ये पावसाचा अंदाज काहीसा कमकुवत असला तरी परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल ठरेल, असे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे घाबरून न जाता स्थानिक हवामान अंदाजावर आधारित पीक व्यवस्थापन केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.