बुलढाण्यात ५,२९१ मयतांची नावे मतदार यादीत, ७,४०० नावे दुबार; संजय गायकवाड यांचा बाेगस मतदानामुळेच विजय झाल्याचा जयश्री शेळकेंचा दावा ; मतदार यादीतील घाेळावरून उद्धवसेना आक्रमक...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा आणि माेताळा तालुक्यातील मतदार याद्यांमध्ये तब्बल ५ हजार २९१ मयतांचा समावेश असून ७ हजार ४०० लाेकांची नावे दुबार आहेत.एवढेच नव्हे तर बुलढाणा मतदार संघात बाेगस मतरांमुळेच संजय गायकवाड हे विजयी झाल्याचा दावा उद्वव सेनेच्या राज्य प्रवक्त्या अॅड. जयश्रीताई शेळके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. 
शेळके यांनी पत्रकारांसमोर दाखले आणि मतदार याद्या सादर करत म्हटले, “आमच्याकडे अनेक मृत मतदारांचे मृत्यूचे दाखले उपलब्ध आहेत. बोगस मतदारांमधील मतचोरीमुळे मला अवघ्या ८४१ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.” त्यांनी मतदार याद्यांतील अनेक गंभीर त्रुटींचा उल्लेख केला. मृत मतदारांची नावे, मतदारांच्या पत्त्यांची अनुपस्थिती किंवा चुकीचे पत्ते, एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी आढळणे, महिलेच्या जागी पुरुषाचा फोटो आढळणे, तसेच मतदार यादीत इतर गावांची नावे दिसणे.
शेळके यांनी सांगितले की महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, अशी अपेक्षा असूनही ९०,८१९ मते मिळूनही पराभव स्वीकारावा लागला. पुढे त्यांनी या पराभवाचे कारण शोधले तेव्हा मतदार याद्यांतील घोळ समोर आला.
५,२९१ मतदार मयत असून, २,२९१ मृत मतदारांची नावे आमच्याकडे प्रती म्हणून प्राप्त झालेली आहेत आणि त्यांच्या मृत्यूचे दाखलेही आहेत, असे शेळके म्हणाल्या. मोताळा तालुक्यातील निपाणा गावात मतदारसंख्या १,१२६ असून अनेक भाग क्रमांकांत विसंगती आढळल्या. सागवन येथील यादी (भाग क्रमांक २६७) मध्ये अनेक घरांचे पत्ते ‘शून्य’ किंवा अ, ब, क अशा स्वरूपात नोंदले आहेत. मतदार केंद्र २६३ च्या यादीत क्रमांक १२३ मध्ये विविध जातीचे १२६ लोक एका घरात वास्तव्यास असल्याचे नोंदले आहे. भाग क्रमांक २६८ मध्ये मतदार क्रमांक १७७ चे घर क्रमांक ३३६६० असे दर्शविण्यात आले असून त्या भागातील वास्तविक लोकसंख्या सुमारे १५ हजार असल्याचे सांगितले गेले — अशा पद्धतीने बोगस मतदान स्पष्ट होते. सागवनमध्ये अंदाजे २ हजार मतदान बोगस असल्याचा दावा. घराचा पत्ता नसलेले किंवा घर क्रमांक नसलेले ३,८३५ मतदार आढळले, असेही डी. एस. लहाने यांनी नमूद केले.
अधिकार्‍यांवर प्रश्नचिन्ह; न्यायालयात मागणी
शेळके आणि त्यांच्या पक्षाने केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग तसेच जिल्हाधिकारी यांना मतदार याद्या पारदर्शक करण्याची मागणी केली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बोगस मतदानामुळे मतदान प्रभावित होऊ नये म्हणून निवडणुका पुढे ढकलून आधी याद्यांचा तपास करावा, अशीही त्यांची मागणी राहिली. तसेच त्यांनी मतमोजणी काळातील मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज उच्च न्यायालयाकडे मागवण्याची मागणीही केली आहे.
मृत्यूनंतरही पंधरावर्ष मतदार यादीत नाव 
सुंदरखेडमधील भाग क्रमांक २६१ मध्ये एका मतदाराचा मृत्यू २०१० मध्ये नोंदलेला असूनही पंधरा वर्षांनंतरही त्यांचे नाव यादीत कायम आहे. २००४ साली सरदारसिंग देवसिंग गायकवाड राजपूत यांचे निधन झाले; त्यांचे नाव २१ वर्षांनंतरही यादीत असल्याचे दाखले सादर करण्यात आले. पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, डी.एस. लहाने, लखन गाडेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.