बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! २८ आणि २९ नोव्हेंबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे; मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी गणना प्रपत्र दाखल करा!

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मतदार यादीत आपले नाव कायम राहावे, यासाठी जिल्ह्यातील पात्र मतदारांना महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR-2026) अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, २८ नोव्हेंबर आणि रविवार, २९ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित पात्र मतदारांनी या शिबिरांचा लाभ घेऊन गणना प्रपत्र दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंदींच्या पडताळणीदरम्यान संबंधित पात्र मतदारांना आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी किंवा नोंदविण्यासाठी गणना प्रपत्र (EF) दाखल करण्याची सुविधा या विशेष शिबिरांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारांना आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे गणना प्रपत्र सादर करता येणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण आणि संकलन करण्यात येत आहे. प्राप्त गणना प्रपत्रांवर १० डिसेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असून, २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी ही संधी दवडू नये!

बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर या सातही विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरे होणार आहेत. त्यामुळे संबंधित पात्र मतदारांनी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून गणना प्रपत्र दाखल करावे आणि मतदार यादीतील आपली नोंद सुनिश्चित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.