संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! हयात प्रमाणपत्र अद्यावत करा.. नाहीतर जूनपासून लाभ बंद;
चिखलीतील लाभार्थ्यांना प्रशासनाचे आवाहन... संपूर्ण प्रक्रिया बातमीत वाचा..
May 9, 2026, 16:22 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ हयात प्रमाणपत्र अद्यावत करून घ्यावे, असे आवाहन तहसिलदार विजय सवडे यांनी केले आहे.
शासन निर्णय क्रमांक केपुयो-२०२६/प्र.क्र.४२/विसयो दिनांक ७ मे २०२६ नुसार लाभार्थ्यांना आता Beneficiary Satyapan App द्वारे डिजिटल पद्धतीने हयात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. लाभार्थी स्वतः, नातेवाईकांच्या मदतीने किंवा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र तसेच नागरी सेवा केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
हयात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी मोबाईलवरील गुगल प्ले-स्टोअरमधून Beneficiary Satyapan App आणि Aadhar Face RD हे ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाद्वारे नोंदणी करून संबंधित योजनेची निवड करावी लागणार आहे. फेस कॅप्चर किंवा बोटांचे ठसे यांच्या साहाय्याने डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करता येणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या नियमानुसार हयात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे जून महिन्यापासून संबंधित योजनेचे लाभ बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहून तातडीने प्रमाणपत्र अद्यावत करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात काही अडचण किंवा शंका असल्यास संबंधित गावातील तलाठी, कोतवाल किंवा तहसिल कार्यालय, चिखली येथील संगायो शाखेशी संपर्क साधावा, असेही तहसिलदार विजय सवडे यांनी सांगितले.