शेतकऱ्यांनो महत्त्वाची बातमी! राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनची शक्यता कमीच! कोकणात दाखल झाला असला तरी सर्वदुर सक्रिय नाही! पेरणीची घाई न करण्याचे आवाहन...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नैऋत्य मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसह काही भागांमध्ये नऊ जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र असे असले तरी मान्सून अद्यापही सर्व दूर सक्रिय झालेला नाही. त्यामुळे किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजातून दिसून येत आहे. जोपर्यंत समाधानकारक पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई न करण्याचे आवाहन हवामान विभागासह कृषी विभागाने देखील केले आहे.

सध्याच्या प्राप्त हवामान अंदाजानुसार १५ जून पर्यंत विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस होऊ शकतो. मात्र असे असले तरी हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी स्थिती नाही. १२ जून पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्या प्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात 40° पेक्षा अधिक तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमान राहील. 
दरम्यान वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाट होते वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रांसफार्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापक विभागाकडून करण्यात आले आहे.