बुलडाण्यासह पावसाने ओढ दिलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पावसाने ओढ दिलेल्या भागांमध्ये अनुकूल हवामान परिस्थिती असताना कृत्रिम पाऊस (Cloud Seeding) पाडण्याचा प्रयोग तातडीने राबवावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ४ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. 

पत्रात जाधव यांनी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्याच्या कालावधीतील पाऊस अत्यंत महत्त्वाचा असून पावसाची ओढ कायम राहिल्यास पिकांवर तसेच जलसाठे व भूजल पुनर्भरणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

२ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ५७ टक्के कमी नोंदविले गेले असल्याचा दाखला देत जाधव यांनी ही परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच बुलडाणा येथे २ ते ३ सप्टेंबरदरम्यानच्या २४ तासांत पावसाची नोंद झालेली नसल्याची माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक उपाययोजनांसोबतच आधुनिक वैज्ञानिक व तांत्रिक पर्यायांचा तातडीने विचार करण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. कृत्रिम पर्जन्य निर्मिती अर्थात Cloud Seeding हा संभाव्य पर्याय असून त्यासाठी ढगांचा विशिष्ट प्रकार, पुरेशी आर्द्रता आणि अनुकूल वातावरणीय परिस्थिती आवश्यक असते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) तसेच संबंधित तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक व्यवहार्यता तपासून हा प्रयोग राबविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यासह पावसाने दडी मारलेल्या विदर्भातील आणि राज्यातील आवश्यक भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट विनंती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.