लोणार तालुक्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीचा सुळसुळाट! मर्यादेपेक्षा अधिक उपसा..डोळेझाक कुणाची? रेतीच्या खेळातून "खिसे गरम"होत असल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप!

शासनाच्या कोट्यवधींच्या महसूल ला चुना! बावनकुळेंकडे तक्रार....
 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..लोणार तालुक्यात रेतीमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय..
लोणार तालुक्यातील एकूण ५ घाटांचे लिलाव झालेले आहेत, एका विशिष्ट मर्यादेत उपसा आणि विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.. मात्र नियमांची पायमल्ली करून मर्यादेपेक्षा अधिक उपसा करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्या जातोय..आपले पाप उघडकीस येऊ नये म्हणून लिलावधारक आणि अधिकारी(?) मिळून वेगवेगळी शक्कल लढवितात..मात्र आता या सगळ्या पापांचा घडा भरला असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.
बुलडाणा
लोणार तालुक्यात खापरखेड लाड अ, खापरखेड लाड ब, सावरगाव तेली/चांगेफळ,सावरगाव तेली अ आणि भुमराळा अशा ५ रेतीघाटांचा लिलाव झालेला आहे. शासन नियमानुसार अंदाजे उपलब्ध वाळूसाठ्याच्या ९० टक्के वाळू उपसा करण्याची परवानगी आहे. त्यानुसार खापरखेड लाड अ मधून ८७६५ ब्रास, खापरखेड लाड ब मधून १६९५८.७० ब्रास,सावरगाव तेली/चांगेफळ मधून ३५५४ ब्रास, सावरगाव तेली ब मधून ६१८४ ब्रास तर भुमराळा येथील घाटातून सर्वाधिक २१२०१ ब्रास रेती उपसा करण्याची परवानगी आहे. खापरखेड लाड अ आणि ब घाट डिसेंबर २०२५ पासून तर उर्वरित ३ घाट ३ जून २०२५ पासून सुरू आहेत. पाचही घाटांची मुदत ३० सप्टेंबर २०२६ ला संपणार असली तरी १० जून २०२६ च्या सायंकाळ नंतर घाटातून उपसा करता येणार नाही. १० जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत केवळ साठवणूक केलेल्या रेतीची विक्री लिलावधारकांना करता येणार आहे. त्यामुळे सध्या लिलावधारक घाटमालकांकडून मोठ्या प्रमाणात रेती उपसा करून साठवणूक करण्यावर भर देण्यात आहे, याशिवाय दररोज शंभरावर अधिक विना रॉयल्टी टिप्पर देखील लोणार मधून सुसाट धावत आहेत..मात्र दाखवण्यापुरती कारवाई करून अधिकारी देखील खिसे गरम करत असल्याची माहिती दबक्या आवाजात ऐकू येत आहे
रेट ठरलेत....
शासनाने ठरवून दिलेला मर्यादित रेती उपसाच नव्हे तर त्याच्या दुप्पट , तिप्पट उपसा घाटमालकांनी आतापर्यंतच केला असल्याचा अंदाज आहे . मात्र विना रॉयल्टी विना नंबर वाहतूक करून अतिरिक्त उपसा लपवून शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवल्या जात आहे. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे..अर्थात अधिकारी का दुर्लक्ष करत आहेत हे वेगळे सांगायला नको. प्रत्येकाचे स्वतंत्र रेट ठरले आहेत..तशा आशयाची पक्की माहिती मिळत आहे. एका टिप्पर मागे महिन्याला" बडा आकडा "बड्या साहेबांच्या" माणसांकडून वसूल केल्या जात असल्याची मोठी चर्चा आहे..ही बाब लोणार तालुक्यासाठी नक्कीच "भूषणा"वह नाही! 
विना नंबरचे टिप्पर, चिखलाने लपवलेल्या नंबर प्लेट..
अगदी लोणार शहरातील बस स्टँड, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय परिसरातून विना परवाना रेतीची वाहतूक करणारे टिप्पर दिवसाढवळ्या सुरू आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश टिप्पर विना नंबर प्लेटचे , नंबर प्लेट चिखलाने लपवलेल्या स्थितीतील असतात..मात्र अगदी कार्यालयाच्या जवळून जात असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नाही..एखादी कारवाई केल्यावर त्याचा गाजावाजा मात्र मोठा केल्या जातो..सगळी "मिलीभगत" असल्याने कारवाई करण्याची हिंमत "साहेब" करतील तरी कसे? लोणारचे हे कारनामे बावनकुळेंच्या दरबारात पोहचल्यावर बावनकुळे काय ॲक्शन घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...