मोठ्या घडामोडीनंतर आयजी रामनाथ पोफळे बुलढाण्यात धडकले...! काय काय घडलं?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा पोलिस दलात गेल्या आठवड्यापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. एसपी पानसरे यांची बदली, निलेश तांबे यांनी स्वीकारलेला पदभार, त्यानंतर पानसरेंच्या बदलीला कॅट कडून स्थगिती, LCB चा पोलिस कर्मचारी गजानन माळी याला लाच घेतांना झालेली अटक या सगळ्या पार्श्वभूमीवर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोफळे आज ,२७ मार्च रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत..त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे..
गेल्या आठवड्यात एकाएकी विश्व पानसरे यांच्या बदलीचे आदेश धडकले होते. त्याच आदेशात निलेश तांबे यांची बुलडाणा एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आठ महिन्यांत बदली झाल्याने अन्यायाची भावना असल्याने एसपी विश्व पानसरे यांनी या आदेशाला कॅट मध्ये आव्हान दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या आदेशाला स्थगिती देण्यात आली. त्याआधीच निलेश तांबे यांनी बुलढाण्यात येऊन पदभार स्वीकारला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस कर्मचारी गजानन माळी याला अकोला येथील एसीबी पथकाने मलकापुरात लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे कारण देत माळी याला जिल्हा पोलिस दलातून निलंबीत करण्यात आले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज आयजी रामनाथ पोफळे बुलढाण्यात आले आहेत..
जिल्ह्याचे एसपी कोण?
दरम्यान सध्या जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे असल्याचे जिल्हा पोलिसांच्या वेबसाईट वर म्हटले आहे. एसपी कार्यालयात देखील निलेश तांबे आपला कार्यभार दिमाखात सांभाळत आहेत. कालच त्यांनी जिल्हा पोलिस दलाची आढावा बैठक घेतली. दुसरीकडे विश्व पानसरे हे सध्या आजारी रजेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजारी रजेवरून परतल्यानंतर विश्व पानसरे पुन्हा पदभार घेतील का?यासह विविध चर्चा जिल्हा पोलिस दलात सुरू आहेत...