“काजू-बदाम पाठवतोय, आता तरी शेतकऱ्यांच्या बांधावर या!” आढावा बैठकीत काजू-बदाम खाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर या; चिखलीत शेतकरी संघटनांचे अनोखे ‘भीक मांगो’ आंदोलन...

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कर्ज काढून आणि उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांकडे आता सरकारला देण्यासाठी काहीच उरलेले नाही, असा उपरोधिक संदेश देत शेतकरी संघटना आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने चिखली शहरात अनोखे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.

आढावा बैठकीत काजू-बदाम खाण्यापेक्षा मंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी चिखली शहरातील विविध भागांत फिरून नागरिक, व्यापारी आणि किराणा दुकानदारांकडून पैसे तसेच काजू-बदाम जमा केले. “शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याच्याकडे सरकारला देण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे आम्हीच काजू-बदाम जमा करून सरकारला पाठवत आहोत. आढावा बैठकीत काजू-बदाम खाण्यापेक्षा आता हे काजू-बदाम घेऊन तरी शेतकऱ्यांच्या बांधावर या,” असा उपरोधिक टोला आंदोलनकर्त्यांनी लगावला.

दरम्यान, आंदोलनातून जमा करण्यात आलेले पैसे आणि काजू-बदाम चिखली तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या.

पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होत असताना शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.