खामगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात अन् कारमधून निघाला तब्बल २६ किलो ६७० ग्रॅम गांजा! उड्डाणपुलावर कार-कंटेनरची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू!

 अपघातग्रस्त कारची तपासणी करताच पोलिसांना धक्का; लाखोंच्या गांजाचे गूढ काय?

 
 खामगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राष्ट्रीय महामार्गावर झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर समोर आलेले गांजा वाहतुकीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. खामगावजवळील टेंभुर्णा फाटा नजीकच्या उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक होऊन कारमधील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. मात्र, या अपघाताला वेगळेच वळण मिळाले ते पोलिसांनी अपघातग्रस्त कारची तपासणी केल्यानंतर! कारमध्ये तब्बल २६ किलो ६७० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असला तरी कारमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा नेमका कुठून आणला जात होता आणि तो कुठे पोहोचवला जाणार होता, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरच्या रात्री खामगावजवळील राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाटा नजीकच्या उड्डाणपुलावर ही भीषण दुर्घटना घडली. जीजे ०६ बीवाय १८०४ क्रमांकाचा कंटेनर नागपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी एमएच ३० एफ ८३८५ क्रमांकाची कार आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की, कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये कारचालक सतीश सखाराम जाधव (वय ५३, रा. माडाखोळी, जि. परभणी) आणि सय्यद फिरोज सय्यद महबूब (वय ४६, रा. हिंगोली) यांचा समावेश आहे.

अपघातग्रस्त कारमधून येत होता उग्र वास; तपासणी केली अन् समोर आले भलतेच प्रकरण!

अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कारची पाहणी सुरू केली. यावेळी अपघातग्रस्त कारमधून उग्र वास येत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर पंचांसमक्ष कारची झडती घेण्यात आली. कारच्या मागील सीटवर एका पिवळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आणि खाकी रंगाच्या टेपने बंद केलेल्या २१ पुड्या आढळून आल्या. या पुड्यांमध्ये गांजासदृश पदार्थ असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

या पदार्थाचे वजन केले असता तब्बल २६ किलो ६७० ग्रॅम वजन भरले. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कारमधून वाहून नेला जात असल्याचे समोर आल्याने अपघाताच्या तपासाला अमली पदार्थ वाहतुकीचे गंभीर वळण मिळाले.पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. अपघातग्रस्त कारची किंमत पाच लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले असून, गांजा आणि कार असा एकूण सुमारे १८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

गांजा कुठून आणला? कुणाला पोहोचवणार होते? अपघाताने उघडले तस्करीचे गूढ!

या अपघातानंतर आता सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती कारमध्ये सापडलेल्या गांजाची! तब्बल २६ किलो ६७० ग्रॅम गांजा घेऊन ही कार नेमकी कुठून निघाली होती? एवढा मोठा साठा कोणाच्या सांगण्यावरून वाहून नेला जात होता? गांजा पोहोचवण्याचे ठिकाण कोणते होते? या वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.विशेष म्हणजे, अपघातात कारमधील दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे या गांजा वाहतुकीचे धागेदोरे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. कारमधील गांजाचा पुरवठादार कोण होता आणि हा साठा कोणासाठी नेला जात होता, याचा शोध घेणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

अपघाताचा स्वतंत्र गुन्हा; गांजाप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई!

या प्रकरणी कंटेनरचालक साबिरअली इंतजारअली (वय २४, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीवरून मृत कारचालक सतीश जाधव यांच्याविरुद्ध अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारमध्ये गांजासदृश पदार्थ आढळून आल्याने एनडीपीएस कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताच्या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार कैलास सावंत करीत असून, एनडीपीएस प्रकरणाचा तपास परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर कदम करीत आहेत.