शिवणी आरमाळ येथे नाही पेटली होळी; ना बनली पुरणपोळी; पेटली ती कैलास नागरेंची चिता; शोकाकुल वातावरणात शेतकऱ्यांसाठी शहीद झालेल्या कैलास नागरेंवर अंत्यसंस्कार...

 
 देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणारे शिवणी आरमाळ येथील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आज होळीच्या दिवशी आत्महत्या केली. कैलास नागरे यांचे मुळ गाव सावखेड नागरे ,शिवणी आरमाळ यासह पंचक्रोशीतील सर्वच गावांवर आज शोककळा पसरली. कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट वाचून सर्वांचेच हृदय हेलावले होते..गावातील लहान थोरांपासून तर सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या.. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या योध्यावर स्वतःचे जीवन संपविण्याची वेळ यावी यामुळे समाजमन सुन्न झाले..आज सायंकाळी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुसाईड नोट मध्ये आधीच सांगितलेल्या शेतात कैलास नागरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.. कैलास नागरे यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, बहिणी यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता..
  कैलास नागरे हे प्रयोगशील शेतकरी होते. शेतात केलेल्या यशस्वी प्रयोगांमुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा युवा शेतकरी पुरस्कार त्यांना काही महिन्यांआधी राज्यपालांच्या हस्ते देण्यात आला होता. मात्र खडकपूर्णा धरणाचा डावा कालवा सुरू करून पाणी पाझर तलावांमध्ये टाकावे अशी कैलास नागरे यांची मागणी होती. यासाठी त्यांनी डिसेंबर महिन्यात अन्नत्याग आंदोलनही केले होते. मात्र प्रशासकीय पातळीवरून त्यावर आवश्यक ती कार्यवाही न झाल्याने कैलास नागरे चिंतेत होते. सुसाईड नोट मध्येही "आपण पाण्यासाठी आहुती देत आहोत" असे कैलास नागरे यांनी लिहिले. कैलास नागरे परिसरातील युवा शेतकऱ्यांसाठी आयडॉल होते.. जिल्ह्यासह बाहेरील शेतकरी देखील कैलास नागरे यांचे शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी शिवणी आरमाळ येथे यायचे,त्यामुळे कैलास नागरे यांचा मोठा गोतावळा तयार झाला होता. त्यामुळे कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. शिवणी आरमाळ येथे आज ना होळी पेटली ना कुणाच्या घरी पुरणपोळी बनली..पेटली ती कैलास नागरेंची चिता..!!