बुलढाण्याला ऐतिहासिक मानाचा मुजरा! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राजमाता जिजाऊ’ नाव....

 
 बुलढाणा (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे करण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यास अधिकृत मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 28 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढाव्यात, या उद्देशाने 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. आता या संस्थेला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आल्याने या प्रकल्पाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.

राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे असून, त्यांच्या राष्ट्रप्रेम, त्याग व लोककल्याणाच्या विचारांनी स्वराज्य स्थापनेला प्रेरणा दिली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या महाविद्यालयाच्या नामकरणाचा निर्णय शासनाने घेतला होता.


दरम्यान, या नामकरणाचा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून प्रसिद्ध करण्यात आला असून, यानंतर महाविद्यालयाची अधिकृत ओळख ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ अशी झाली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात नवा टप्पा गाठला जाणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.