हिरडव जिल्हा परिषद शाळेचा प्रवेशोत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू; पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून स्वागत...

 
 हिरडव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा हिरडव येथे २३ जून रोजी शालेय वर्षाचा प्रारंभ एका अनोख्या आणि संस्मरणीय उपक्रमाने झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून, ढोल-ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. फुलांच्या गुच्छांनी त्यांचे स्वागत करत गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले होते.
हिरडव
सामान्यतः जिल्हा परिषद शाळा बंद पडत असल्याच्या बातम्या येत असताना, हिरडव शाळेचा हा उपक्रम आशादायक आणि प्रेरणादायी ठरला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून साकार झालेला हा उपक्रम सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. गटशिक्षणाधिकारी यांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत शाळा व समितीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षकवृंद तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिकतेची आणि शिक्षणप्रेमाची ही सांगड विद्यार्थ्यांच्या मनावर नवी उमेद निर्माण करणारी ठरली. हिरडव शाळेच्या या स्वागतसोहळ्यामुळे एक सकारात्मक संदेश समाजात पोहोचला असून, गावशाळा हीदेखील परिवर्तन घडवू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.