

"हिंदूंनी धर्माभिमानाने जगावं; जनसंख्या संतुलन ही काळाची गरज! विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांचे प्रतिपादन! म्हणाले, हिंदुनी दोन ते तीन अपत्ये जन्माला घालावीत...
Apr 10, 2025, 19:58 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदूंनी हिंदू म्हणून जगणं गरजेचं आहे. आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे.” हिंदूंची घटती लोकसंख्या ही चिंतेची बाब असून देशात लोकसंख्या संतुलन राखणं काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू कुटुंबाने किमान दोन ते तीन अपत्ये जन्माला घालावीत असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी केले.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे बुलढाण्यात आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी जिल्हा मंत्री माधवची धुंधळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक मयूर करे, तसेच शहर अध्यक्ष उत्कर्ष ढाकणे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना गोविंद शेंडे म्हणाले की,आपल्याला आपल्या हिंदू धर्माचा अभिमान असला पाहिजे. लव्ह जिहाद, लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या विषयांवरही त्यांनी भाष्य केले . मुलांना फक्त करिअरकेंद्रित न ठेवता त्यांना सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचीही जाणीव करून देणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.
गोहत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स करा...
“महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गोहत्या होत आहेत, मात्र पोलिस मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स तयार करणं गरजेचं आहे,” असेही शेंडे म्हणाले.
हिंदू मिरवणुकांवर होणारे हल्ले, तसेच हिंदूंवरील आक्रमणामुळे देशाच्या संपत्तीचंही नुकसान होत असल्याने दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गोविंद शेंडे यांनी केली.