अरेच्चा... हे काय नवीन? "चंगळ्या बोले कुहू" म्हणत मद्यधुंद महिलांचा रस्त्यावर राडा; व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल!

 
 छत्रपती संभाजीनगर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क ) : सध्या सोशल मीडियावर ‘चंगळ्या बोले कुहू’ या डायलॉगवर बनवलेले व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, याच डायलॉगचा वापर करत तीन महिलांनी छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

घटना शहरातील हाय प्रोफाईल भाग असलेल्या समर्थ नगर परिसरातील असून, सायंकाळच्या सुमारास तीन महिला मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर आल्या. त्यांनी आधी एका घराजवळ अश्लील हावभाव करत आत शिरण्याचा प्रयत्न केला. घरात एकटी महिला असल्याचे पाहून तिला शिवीगाळ करत दगडफेकही करण्यात आली.
यानंतर त्या महिला रस्त्यावर आल्या आणि "चंगळ्या बोले कुहू" म्हणत गाड्या अडवून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालू लागल्या. रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच काही गाड्यांवर दगडफेकही करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांच्या समजावणीअंतीही महिलांचा गोंधळ काही काळ सुरूच राहिला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या महिला याच परिसरात नेहमी वावरत असून याआधीही त्यांच्यामुळे त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे या महिलांविरोधात योग्य ती कारवाई करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, तासभर रंगलेल्या या नाट्यमय प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हसण्यावारी नेले असले तरी बहुतांश नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.