विदर्भात उभे राहणार ‘वनौषधी केंद्र’; शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळावे – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
Feb 27, 2026, 10:41 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विदर्भात वनौषधींची समृद्ध नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत औषधी वनस्पतींची लागवड करण्याकडे वळावे, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या ‘आयुर्वेदिक शेती उत्पादन आणि विक्री मार्गदर्शन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आयुष मंत्रालय कटिबद्ध असल्याचे सांगताना मंत्री जाधव म्हणाले की, आगामी काळात विदर्भात ‘वनौषधी केंद्र’ विकसित करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ वनौषधी उत्पादनावरच नव्हे, तर त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरही भर देता येईल. उत्पादित मालाच्या विक्रीसाठी मंत्रालयामार्फत अधिकृत विपणन व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याने मध्यस्थांकडून होणारी पिळवणूक कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात तांत्रिक मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. (डॉ.) महेश कुमार दाधीच तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत नागार्जुन वन औषधी प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. नितीन पतके उपस्थित होते. त्यांनी वनौषधींची निवड, लागवड तंत्रज्ञान, काढणीनंतरची प्रक्रिया आणि बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी कार्यक्रमस्थळीच नामांकित औषधी कंपन्यांशी खरेदी-विक्री करार केले. या करारांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला निश्चित बाजारपेठ आणि योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवून वनौषधी शेतीबाबत उत्साह व्यक्त केला.