लाेणार, शेगाव तालुक्यातील ५३ गावांना अतिवृष्टीचा तडाखा! २६ हजार ६०५ हेक्टवरील पिके पाण्यात; शेतकरी संकटात...!
Jul 23, 2025, 17:50 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लाेणार आणि शेगाव तालुक्यात २१ आणि २२ जुलै राेजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे ५३ गावातील २६ हजार ६०५ हेक्टवरील पिके पाण्यात गेली आहेत. आधीच हुमनीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आधीच उसनवारी करून कर्ज काढून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली हाेती. आता दुबार पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
लाेणार तालुक्यात २१ जुलै राेजी ढगफुटीसदृश्य पाउस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आला हाेता. त्यामुळे, नदी, नाल्याकाठावरील पिके वाहून गेली. तसेच पिकांमध्ये पाणी साचल्याने तलाव निर्माण झाले हाेते. लाेणार तालुक्यातील ४२ गावातील २४ हजार ५०० हेक्टरवरील मूग, साेयाबीन आणि तूर पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेगाव तालुक्यातील ११ गावातील २ हजार १०० हेक्टवरील मूग आणि साेयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. दाेन्ही तालुक्यात नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.