हृदयद्रावक! देऊळगावराजामध्ये दोन वर्षीय ईश्वरीचा हौदात पडून मृत्यू; शहरात शोककळा...

 
 देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)– अवघ्या दोन वर्षांची निरागस ईश्वरी… खेळता-बागडता जीव काही क्षणांत काळाच्या अधीन झाला. देऊळगावराजा शहरातील त्र्यंबक नगर भागात एका चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत चिमुकलीचे नाव कु. ईश्वरी अंकुश हरणे (वय २) असे आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ती घराबाहेर खेळत असताना अचानक कुठे गायब झाली. कुटुंबीयांनी तातडीने तिचा परिसरात शोध सुरू केला, मात्र बराच वेळ ती सापडलीच नाही. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस व स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू असताना घरासमोरील पाण्याच्या हौदाकडे लक्ष गेलं.
शंका आल्याने हौदातील पाणी काढून पाहिलं असता, ईश्वरीचा मृतदेह त्यात आढळून आला. ही दृश्यं पाहून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि परिसर शोकमग्न झाला.
ईश्वरीच्या निधनामुळे हरणे कुटुंब उध्वस्त झालं आहे. बालवयातील ही दुर्दैवी घटना केवळ त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण देऊळगावराजा शहराला हेलावून गेली.
सावधगिरीची गरज अधोरेखित..
 
शहरांमध्ये उघडे हौद, कुंड, टाक्या ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात, हे या घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले आहे. बालकांच्या सुरक्षेसाठी पालकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने देखील अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.ईश्वरीच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, शेकडो नागरिकांनी हरणे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.