हृदयद्रावक! पुत्रवियोगाची करुण कहाणी; मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर सावडण्याच्या दिवशीच आईनेही केला प्राणत्याग.. चिखलीतील घटना

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुलाच्या आकस्मिक मृत्यूचा धक्का वृद्ध आईला सहन झाला नाही.मुलाच्या सावडण्याच्या दिवशीच आईनेही प्राणत्याग केला. चिखलीच्या जुनागाव भागात घडलेल्या या घटनेने समाजमन हेलावले आहे.

 चिखली येथील आदर्श विद्यालयात कार्यरत असणारे तुळशीदासजी चांगाडे यांचे गुढीपाडव्याच्या दिवशीच सकाळी अपघाती निधन झाले. गुढीला लावण्यासाठी आंब्याची पाने तोडत असतांना तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने चांगाडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. २१ मार्चला तुळशीदासजी चांगाडे यांचे रक्षाविसर्जन झाले. 
  तुळशीदासजी चांगाडे यांचा स्वभाव सरळ,साधा आणि प्रेमळ होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सक्रीय स्वयंसेवक होते. जुलै २०२७ मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्याआधीच काळाचा आकस्मिक आघात झाला. तुळशीदाची चांगाडे आईची प्रचंड सेवा करायचे. मधल्या सुट्टीत वृद्ध आईला भेटायला घरी यायचे. दरम्यान पुत्रवियोगाचा हा धक्का ९४ वर्षीय आईला सहन झाला नाही,त्यातून तुळशीदासजी चांगाडे यांच्या आई ग. भा. जनाबाई हरिभाऊ चांगाडे यांनीही २१ मार्चला प्राणत्याग केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.