पगार कमी पडायला लागला म्हणून लाच खात होता! मेहकरात महसूल अधिकाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडला! "या" कामासाठी मागितले होते २० हजार...

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी कैलास भगवान मुरकुट (वय ४६) यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे महसूल यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुरकुट हे 'प्रस्तुतकार-१' या पदावर कार्यरत असून मेहकर येथील बालाजी नगर परिसरात वास्तव्यास आहेत. संबंधित प्रकरणात तक्रारदार हे वकील असून त्यांच्या पक्षकाराच्या जमिनीच्या फेरफार रद्द संदर्भातील अपीलावर २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम आदेश झाला होता. मात्र, या आदेशाची मूळ नक्कल प्रत आरोपीकडेच असल्याने तक्रारदाराने ती मिळवण्यासाठी पाठपुरावा केला.
दरम्यान, आदेशाची प्रत देण्यासाठी मुरकुट यांनी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची प्राथमिक पडताळणी करताना आरोपीने लाच मागितल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. १६ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षातच तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने मुरकुट यांना रंगेहात जेरबंद केले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तसेच पथकात पोलिस हेडकॉन्स्टेबल नितीन टवलारकर, योगेश खोटे व मंगेश देवकाते यांचा सहभाग होता.