दारू पिऊन घरी आला... पत्नीने फक्त "एवढंच" विचारलं; संतापलेल्या पतीने थेट डोक्यात दगड घातला! शेगावमध्ये धक्कादायक घटना....

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दारू पिण्याच्या कारणावरून पत्नीने विचारणा केल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी विश्वनाथ नगर, शेगाव येथे घडली. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता मधुकर देशमुख (वय ४०) या मजुरीचे काम करून घरी परतल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती मधुकर देशमुख (वय ४५) यांनी त्यांना जेवण वाढण्यास सांगितले. मात्र, पती दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुनीता यांनी दारू का प्यायलात? अशी विचारणा केली.

दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी मधुकर देशमुख यांनी पत्नीला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या पतीने घरासमोरील जमिनीवर पडलेला दगड हातात घेतला.त्यानंतर मधुकर देशमुख यांनी सुनीता यांच्या डोक्याच्या मध्यभागी दगड मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

घटनेनंतर सुनीता देशमुख यांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कायमी अप क्रमांक ६०५/२०२६ नोंदवत मधुकर देशमुख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. सुनील सुसर करीत आहेत.