केसगळती मेहकर तालुक्यातही? दुर्गबोरीच्या तरुणाचे टक्कल पडले; हात लावला की गळतात केस...
Apr 17, 2025, 09:28 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगाव, खामगाव व नांदुरा तालुक्यातील केसगळतीचे अनेक रुग्ण आढळून आले होते. यामुळे नागरिकारण मध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. विविध प्रकारे संशोधन करूनदेखील आजपर्यंत निदान झाले नाही. आयसीएमआरचा अहवाल आतापर्यंत प्राप्त न झाल्याने अद्यापही गुढ कायम आहे. यातच आता मेहकर तालुक्यातही केसगळती पोहोचली आहे. अतिदुर्गम भागातील दुर्गबोरी या गावात एका युवकाला केस गळतीची लागण झाली असून, त्याचे टक्कल पडले आहे.
मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी या अतिदुर्गम भागातील रहिवासी असलेला एक तरुण केसगळतीमुळे त्रस्त होता. त्याने मेहकर ग्रामीण रुग्णालय गाठून तपासणी केली. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. केस गळतीने हैराण असलेला तरुण आपली समस्या घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चव्हाण यांच्याकडे गेला. तपासणी केली असता शेगाव तालुक्यातील रुग्णांप्रमाणेच त्याची लक्षणे दिसून आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरकडे समस्या सांगताना काही दिवसांपासून केस गळतीचा त्रास होत असल्याचे त्याने सांगितले. टक्कल केले, पण नवीन आलेले केस सरळ हात लावल्यावर गळतात. डॉक्टरांनी मल्टीव्हिटॅमिन, अँटी फंगल औषधी दिली. तसेच पुढील उपचार आणि तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.