मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर! बुलढाणा –मलकापूर रोडवरील आमदार गायकवाड यांच्या फार्महाउसजवळ झाड कोसळले, वाहनांच्या लांबच लांब रांगा...
May 15, 2025, 17:49 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यात आज दुपारपासून वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक झालेल्या हवामान बदलामुळे बुलढाणा-मलकापूर रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
आमदार संजय गायकवाड यांच्या फार्महाउसजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अचानक आलेल्या वादळामुळे स्थानिक वाहनधारक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून झाड हटवण्याचे काम सुरू केले.
गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हैदोस घातला असून, आज दुपारी त्याने आणखी जोर पकडला. मोताळा तालुक्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. वादळामुळे शेतीचेही नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.