वादळी वाऱ्याचा कहर! हॉटेलची भिंत कोसळली, सहा मजूर जखमी; एकाची प्रकृती गंभीर; दगडवाडी फाट्यावर घटनेची धावपळ; देऊळगावराजा येथील घटना...
May 20, 2025, 20:48 IST
देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात अवकाळी पावसासोबतच वादळी वाऱ्याने पुन्हा एकदा कहर केला. देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी फाट्यावर असलेल्या वाटिका हॉटेलच्या पत्र्यांसह भिंत कोसळून सहा मजूर जखमी झाले आहेत. यामध्ये एका वेल्डिंग कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याला जालना येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे वाटिका हॉटेलच्या छपरावरील पत्रे उडाले आणि काही क्षणातच हॉटेलची भिंत कोसळली. तेव्हा वादळी वाऱ्यापासून बचावासाठी हॉटेलच्या खोलीत काही मजूर थांबले होते. मात्र भिंत कोसळल्याने ते विटा-दगडांच्या माऱ्यात सापडले.
या घटनेत प्रल्हाद जायभाये, आदिनाथ जायभाये, संजय उगले आणि इतर तीन मजूर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले. यातील सिंदखेडराजा येथील एका वेल्डिंग कामगाराची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, अवकाळी पाऊस आणि वादळामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत नुकसान झाले असून, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.