सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराची मोठी संधी! बुलढाण्यात आज प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन! दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना विविध कंपन्यांत नोकरीची संधी!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा आणि के. बी. जे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोराखेडी (ता. मोताळा) यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन मंगळवार, दि. २७ मे २०२५ रोजी करण्यात आले आहे.
या ड्राइव्हमध्ये नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, रिक्त पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यामध्ये पात्र उमेदवारांची प्राथमिक निवड व प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी दिली.
दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ मे रोजी सकाळी १० वाजता के. बी. जे. आयटीआय, बोराखेडी येथे आवश्यक शैक्षणिक व ओळखपत्रांची मूळ प्रत व छायांकित प्रत घेऊन स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठीही मुलाखती देऊ शकतात. अधिक माहितीसाठी 07262-242342 या क्रमांकावर संपर्क साधावा.
हा प्लेसमेंट ड्राइव्ह बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीच्या दिशेने चालण्याची एक सुवर्णसंधी ठरणार आहे.