खाद्य तेल अभियानांतर्गत गोदाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान; शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी...
Jun 24, 2025, 19:40 IST
बुलडाणा, दि. २४ (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघ, सहकारी संस्था, खाजगी उद्योग यांना गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यासाठी जुलै २०२५ अखेरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केले आहे.
या योजनेच्या माध्यमातून अन्नधान्याची साठवणूक क्षमता वाढवून त्याला चांगला दर मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख रुपये (जे कमी असेल) इतके अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.
अनुदानासाठी लाभार्थ्यांना स्मार्ट, वखार महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागणार आहे. बँकेकडून कर्ज मंजुरीनंतरच अनुदानाची पात्रता निश्चित केली जाईल. अर्ज जास्त प्रमाणात प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या मान्यतेनुसार सोडत पद्धतीने निवड केली जाईल.
तेलबिया प्रक्रियेतील कार्यक्षमता वाढवण्यासाठी १० टन क्षमतेच्या तेल काढणी युनिटसाठीही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा ९.९० लाख रुपये (जे कमी असेल) इतके अनुदान मंजूर केले जाणार आहे. यामध्ये यंत्रसामग्री, उपकरणे आणि प्रक्रिया युनिट्सचा समावेश आहे.
या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या संस्था किंवा उत्पादक संघांनी बँकेकडे प्रकल्प अहवाल सादर करून कर्ज मंजूरी घ्यावी. त्यानंतरच अनुदानासाठी पात्रता ठरेल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जुलै २०२५ अखेरपर्यंत आहे.
तालुकास्तरीय कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित संस्थांनी अर्ज सादर करावा. योजनेविषयी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघ, सहकारी संस्था आणि उद्योजकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपली प्रक्रिया क्षमता व आर्थिक उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केले आहे.