बुलडाण्यात २८ मे रोजी “भव्य आंबा महोत्सव”; शेतकरी व आंबा प्रेमींना दुहेरी संधी! कृषी विज्ञान केंद्रात होणार आंबा प्रदर्शनी व थेट विक्री....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्यांची चव चाखण्याची संधी देण्यासाठी “भव्य आंबा महोत्सव : प्रदर्शनी व विक्री” चे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन बुधवार, दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कृषी विज्ञान केंद्र, अजिंठा रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. दीनदयाळ कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख असतील. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, तसेच विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाची वैशिष्ट्ये :
स्थानिक जातींच्या आंब्यांचे संवर्धन व ओळख
विविध वाणांचे प्रत्यक्ष प्रदर्शन आणि विक्री
आंबा लागवड, व्यवस्थापन व कलम विक्री
तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र
आंब्यापासून तयार विविध प्रक्रिया उत्पादने
या महोत्सवाचा उद्देश शेतकऱ्यांना उत्पादनास वाव देणे, स्थानिक वाणांचे संवर्धन करणे आणि ग्राहकांना दर्जेदार आंब्यांचा थेट लाभ मिळवून देणे असा आहे. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे यांनी शेतकरी, उद्यानविद आणि जिल्हावासीयांना महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.