दुष्काळाचा जीआर म्हणजे केवळ ‘नौटंकी’; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या! जयश्री शेळकेंचा सरकारवर घणाघात; २९ सप्टेंबरला बुलढाण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा
‘पंचनामे करून शेतकऱ्यांना काय मिळणार?’
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ‘ट्रिगर-१’ अंतर्गत पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार, असा सवाल जयश्री शेळके यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली असून, त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ न घालवता शेतकऱ्यांना थेट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पीक विम्याची रक्कम तातडीने जमा करा!
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चालू पीक विम्याची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणीही शेळके यांनी केली आहे. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाल्यास त्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
स्मार्ट मीटरच्या नावाखालील सक्तीची वीजवसुली थांबवा!
शेतकऱ्यांच्या कृषी वीजपुरवठ्याचा प्रश्नही जयश्री शेळके यांनी उपस्थित केला. स्मार्ट मीटरच्या नावाखाली होणारी सक्तीची वीजवसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
२९ सप्टेंबरला बुलढाण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा
या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जयश्री शेळके यांनी केले आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, पीक विम्याची रक्कम आणि वीजवसुलीच्या प्रश्नावरून आता बुलढाण्यात आंदोलनाचा आवाज बुलंद होणार आहे. २९ सप्टेंबरच्या या मोर्चाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.