श्वासानंद परंपरेच्या पाचव्या पीठाधिशपदी गोपाल महाराज पितळे; दसऱ्याच्या मुहूर्तावर श्री नरसिंह संस्थानची घोषणा !

 संत बाळाभाऊ महाराजांच्या गुरुपरंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी; श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर मठातील बैठकीत संस्थानच्या नव्या कार्यकारिणीचीही निवड

 

कीर्तन, प्रवचन आणि वैचारिक लेखनातून प्रबोधनाचे कार्य

गोपाल महाराज पितळे हे कीर्तन, प्रवचन, व्याख्याने आणि वैचारिक लेखनाच्या माध्यमातून सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. अध्यात्म, संतविचार आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा प्रसार करण्यासाठी ते विविध माध्यमांतून योगदान देत आहेत. आता श्वासानंद परंपरेच्या पीठाधीशपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांच्याकडून या गुरुपीठाच्या आध्यात्मिक आणि वैचारिक कार्याला पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संत मुक्ताबाई यांच्या गुरुपरंपरेचा २९ पिढ्यांचा थेट वारसा लाभलेल्या श्वासानंद गुरुपीठाला वारकरी संप्रदायात विशेष मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत या गुरुपीठाचे असंख्य अनुयायी आहेत. त्यामुळे गोपाल महाराज पितळे यांची पीठाधीशपदी झालेली निवड ही संस्थानच्या परंपरेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

श्री नरसिंह संस्थानच्या कार्यकारिणीचीही पुनर्रचना

याच बैठकीत श्री नरसिंह संस्थानच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली. संस्थानच्या विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.- अध्यक्ष : प्रा. डॉ. श्रीहरी महाराज पितळे, सचिव : आशिष उमाळकर,कोषाध्यक्ष : सौ. राधिका पितळे,विश्वस्त : आईसाहेब पितळे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गुरुबंधू उत्तमराव थोटे पाटील होते. विश्वस्त डॉ. अभय कोठारी यांनी प्रास्ताविक केले तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.

श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर मठात मान्यवरांची उपस्थिती

श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर मठात झालेल्या या बैठकीला राजेश राऊत, श्रीरंग सावजी, विठ्ठल खंदारकर, प्रा. संदीप कुटे, डॉ. सौ. शिवालीताई उमाळकर, गंगाधरराव थोटे, विनोद डुरे, कुलदीप उमाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.गोपाल महाराज पितळे यांच्या निवडीमुळे श्वासानंद परंपरेच्या गुरुपीठाला नवे नेतृत्व मिळाले असून, संतपरंपरेतील अध्यात्म, प्रबोधन आणि वारकरी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने या घडामोडीकडे लक्ष वेधले जात आहे.