

जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ६५८ शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीक विम्याचे पैसे होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा यशस्वी पाठपुरावा...
Updated: Mar 29, 2025, 08:10 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ६५८ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या शेतकऱ्यांचा पिक विमा प्रलंबित होता, आता लवकरच हा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे..
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंतर्गत २०२३–२४ चा पिक विमा प्रलंबित होता. काही शेतकऱ्यांना पिक विमा चे वाटप झाले होते, मात्र अद्याप राज्यासह अनेक शेतकरी यापासून वंचित होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा करून पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही बोलावण्यात आली होती. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आता प्रलंबित शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २०२३ –२४ च्या खरीप व रब्बी हंगाम मिळून ४ लाख ५० हजार ७७३ शेतकऱ्यांना ४५३.७६ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.त्यापैकी २ लाख ६७ हजार ११५ शेतकऱ्यांना २६३.५१ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. प्रलंबित असलेल्या १ लाख ८३ हजार ६५८ शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात १९०.२५ कोटींचे वाटप होणार आहे..