शेळीपालन, कुक्कुटपालन की गाय-म्हैस पालन?; बेरोजगारांसाठी मोठी संधी, पण अर्ज करण्यासाठी वेळ मर्यादित...सगळी माहिती बातमीत वाचा..
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या माध्यमातून हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. २ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. तंत्रशुद्ध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारून स्वतःचा उद्योग उभारावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणादरम्यान शेळीपालन, कुक्कुटपालन आणि गाय-म्हैस पालनातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध जातींची माहिती, लसीकरण, पशुरोग व त्यांची लक्षणे, पशुखाद्य निर्मिती, चाऱ्याचे प्रकार, उद्योग उभारणीसाठी आवश्यक नियोजन, उद्योजकता विकास, व्यवसायातील संधी तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान पाचवी उत्तीर्ण आणि १८ वर्षे वयाचा असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी दि. २ जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत श्री. गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९०११५७८८५४ किंवा ८२७५०९३२०१ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने ठोस पाऊल टाकण्याचे आवाहन एमसीईडी अमरावती विभागाचे विभागीय अधिकारी श्री. किशोर अंभोरे यांनी केले आहे.