गौरवास्पद! कृतीरूप जीवनाचा सन्मान; पत्रकार समाधान गाडेकर "आदर्श जीवन पुरस्कार"...! भारत शिक्षक प्रसारक मंडळाने केला सन्मान....
Jan 19, 2026, 12:07 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):समाजातील विविध क्षेत्रांत दीर्घकाळ निस्वार्थपणे आदर्शवत कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत भारत शिक्षण प्रसारक मंडळ, देऊळगाव घुबे यांच्या वतीने दरवर्षी “आदर्श जीवन पुरस्कार” प्रदान केला जातो. सन २०२५–२६ या वर्षासाठी हा मानाचा पुरस्कार चिखली येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार समाधान गाडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते १८ जानेवारी २०२६ रोजी प्रदान करण्यात आला.
जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव तथा आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे पती माननीय विद्याधरजी महाले साहेब, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडरावजी घुबे (अध्यक्ष), विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्या सौ. उषाताई उद्धवराव थुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक ॲड. डी. एन. इंगळे, माजी जिल्हा कोषागार अधिकारी दिनकरराव बावस्कर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष परीहार, पत्रकार अरुण जैन, रणजीतसिंग राजपूत, उद्धव थुट्टे पाटील, मंगरूळ येथील माजी सरपंच शेणफड पाटील सुरुशे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई घुबे, सचिव प्रा. उद्धवराव घुबे, सहसचिव जनार्दन घुबे, जानकीदेवी विद्यालयाचे प्राचार्य हरिदासजी घुबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माननीय विद्याधरजी महाले, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख, शंतनू बोंद्रे व संस्थापक अध्यक्ष शेणफडरावजी घुबे यांच्या हस्ते पत्रकार समाधान गाडेकर यांच्यासह डॉ. अभिजीत पडघान (डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर), उद्योजक बळीरामजी मिसाळ (प्लॅन्ट्रा केमिकल्स, रायगड), ज्येष्ठ लेखक-कवी रवींद्र साळवे, राजर्षी शाहू पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. मालतीताई शेळके यांनाही जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सर्व पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना पत्रकार समाधान गाडेकर म्हणाले, “शैक्षणिक जीवनातच वर्तमानपत्र वाटप करताना पत्रकारितेची गोडी लागली. दैनिक सामना व दैनिक देशोन्नतीसारख्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या वर्तमानपत्रांत काम करताना तीच लढाऊ भूमिका १९९४ पासून अंगात भिनली.
पत्रकारितेतून व्यवसाय झाला नाही, पण अन्याय, अत्याचार व व्यवस्थेतील दोषांविरुद्ध लढण्याचे बळ मला या क्षेत्राने दिले. त्यामुळे मला मिळालेला ‘आदर्श जीवन पुरस्कार’ हा मी काम केलेल्या दैनिक सामना व दैनिक देशोन्नतीला अर्पण करतो.”
तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडराव घुबे यांनी देऊळगाव घुबे येथील माळरानावर उभे केलेले शैक्षणिक संकुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरल्याचे नमूद करत, संस्थेने दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले.
