"शेतकऱ्यांना न्याय द्या!" – बच्चू कडूंच्या आंदोलनाला मोताळ्यातून जाहीर पाठिंबा; विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन, मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले निवेदन

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते मा. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोताळा येथील शेतकऱ्यांनी 
जाहीर पाठिंबा देत ३० ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असून, या मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे.
आंदोलनानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनातशेतकऱ्यांचे कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी करावी,
सोयाबीन, कापूस, मका, तूर या पिकांना हमीभावात खरेदी करण्यात यावी तसेच नाफेड खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावेत.सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, त्यात नियमित कर्जफेड करणाऱ्यांचाही समावेश करावा.
 ऊसाला ४,३०० रुपये प्रति टन दर आणि थकीत एफ.आर.पी. रक्कम तत्काळ द्यावी.
 कांद्याला किमान ४० रुपये दर मिळावा, निर्यातबंदी कायमस्वरूपी रद्द करावी.
गायीच्या दुधाला ५० रुपये व म्हशीच्या दुधाला ६५ रुपये प्रति लिटर दर द्यावा; एफ.आर.पी. धोरण दूध क्षेत्रात लागू करावे.
शेतमालाला हमीभावावर २०% अनुदान आणि घरकुलासाठी ५ लाख रुपये अनुदान द्यावे.
 पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MGNREGA (म.न.रे.गा) मधून करावा.मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहे.
 या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनात दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी मोताळ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.