बुलढाणा तालुक्यातील आदिवासींना जातप्रमाणपत्र द्या; गंगाधर तायडे यांनी सुरू केले उपाेषण; वडिलांकडे किंवा भावाकडे जातप्रमाणपत्र असूनही इतर सदस्यांना ते प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आराेप..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वडीलांकडे किंवा भावाकडे अनुसुचीत जमातीचे जातप्रमाणपत्र असूनही इतर सदस्यांना बुलढाणा तालुक्यात जातप्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे, अनुसूचित जमातीच्या (महादेव कोळी) आदिवासींना २००३ शासन नियमांनुसार जातप्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी पलढग येथील गंगाधर बळीराम तायडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमाेर २९ सप्टेंबरपासून उपाेषण सुरू केले आहे. 
त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक आदिवासी कुटुंबांकडे वडिलांकडे किंवा भावाकडे जातप्रमाणपत्र असतानाही इतर सदस्यांना प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक व शासकीय योजनांचा लाभ स्थानिक आदिवासींना मिळत नाही. महसूल प्रशासनाच्या या धोरणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजगार आणि जीवनमान खालावले आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाने २००३मध्ये केलेल्या नियम ३ (४) तरतुदीनुसार प्रमाणपत्र मिळण्याचा अधिकार असताना, बुलढाणा तालुक्यातील आदिवासींना ते नाकारले जात आहे. २०११ च्या जनगणनेत तालुक्यात आदिवासींचे अस्तित्व नोंदवले असून, शासन निर्णयातसुद्धा बुलढाणा तालुका अनुसूचित जमातींसाठी मान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरपर्यंत मागणी पूर्ण न झाल्याने २९ सप्टेंबर पासून गंगाधर तायडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले आहे. मागणी मान्य हाेईपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.