हप्तेखोर गजानन माळी जिल्हा पोलिस दलातून निलंबीत! टिप्पर वाल्याकडून १४ हजार घेतांना एसीबीने पकडला होता रंगेहाथ...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन दिवसांपूर्वी मलकापुरात अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी याला १४ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली होती. जिल्हा पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या या हफ्तेखोर गजानन माळीला जिल्हा पोलिस दलातून निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे...

गजानन माळी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. मलकापुरातील शिवनेरी ढाब्यावर त्याने एका रेतीच्या टिप्पर वाल्याकडून दोन महिन्यांचा हफ्ता म्हणून १४ हजार घेतले होते. टिप्पर वाल्याने आधीच अकोला एसीबीला अवगत केलेले होते, त्यामुळे एसीबी पथकाने रचलेल्या साफळ्यात गजानन माळी अलगद अडकला.
त्याच्याविरोधात मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, दरम्यान गजानन माळी याच्या घराच्या तपासणीत १२ लाख रुपयांची रोकड आढळली. माळी याचे हे कृत्य जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे होते, त्यामुळे त्याच्या विरोधात कठोर कारवाई करीत त्याला जिल्हा पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे...