CRF अंतर्गत रस्त्यांसाठी निधी द्या; प्रतापराव जाधवांची गडकरींकडे मागणी; बुलढाण्यात रस्ते विकासाला गती देण्याची मागणी; नांदुरा रेल्वे क्रॉसिंगवर पूल उभारण्यावर भर...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात केंद्रीय रस्ता निधी (CRF) अंतर्गत नवीन रस्ते व महामार्गांच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
रस्ते हे देशाच्या प्रगतीचे मुख्य आधार मानले जातात. आर्थिक विकास, दळणवळण सुलभता आणि सामाजिक एकात्मतेसाठी सक्षम रस्ते जाळे आवश्यक असते. आधुनिक व सुसज्ज रस्त्यांमुळे कृषी, उद्योग आणि व्यापाराला गती मिळते तसेच ग्रामीण भाग शहरांशी जोडला जाऊन रोजगाराच्या संधी वाढतात.
केंद्र सरकारच्या माध्यमातून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अनेक महामार्गांची निर्मिती झाली असली, तरी काही महत्त्वाचे रस्ते अद्याप प्रलंबित आहेत. हे रस्ते CRF अंतर्गत पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील दळणवळण अधिक सक्षम होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संबंधित प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील नांदुरा येथील रेल्वे क्रॉसिंगचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरपास नसल्यामुळे जळगाव जामोद व संग्रामपूर या आदिवासी भागाकडे जाणाऱ्या वाहनांना रेल्वे क्रॉसिंग उघडेपर्यंत थांबावे लागते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
जनभावनेचा विचार करून या ठिकाणी पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत जिल्ह्यातील विकासात्मक रस्ते प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले, अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली.