इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे उघड; मोताळा तालुक्यात १९ वर्षीय युवकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारोळापीर येथील संदेश समाधान तायडे (वय १९) याची इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली आणि मोबाईलवरून फोन तसेच मेसेजद्वारे नियमित संपर्क सुरू होता. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने १० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर सुमारे १५ दिवसांनीही असाच प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.
दरम्यान, काही काळानंतर पीडित मुलीला सतत ताप आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला. मागील दोन महिन्यांपासून हा त्रास सुरू असल्याने आणि प्रकृती खालावत असल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.या प्रकरणी संदेश समाधान तायडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(२)(M), ६५(१), ३३३ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा अर्थात पोक्सोच्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास धा. बढे पोलीस करीत आहेत.
सोशल मीडियावरील ओळखींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखी आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क साधताना मुलांनी सावध राहणे, तसेच पालकांनी मुलांशी संवाद ठेवून त्यांच्या ऑनलाइन वावराबाबत जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. अल्पवयीन मुलांशी संबंधित अशा प्रकरणांत त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करणेही तितकेच आवश्यक आहे.