तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; तुपकरांची तब्येत प्रचंड खालावली; हाइपोग्लाइसीमिया मुळे कोमात जाण्याची शक्यता? तुपकर म्हणाले, मी शहीद व्हायला तयार..

पण शेतकऱ्यांचं भलं करा!उद्या राज्यात शेतकरी करणार चक्काजाम; समृध्दी महामार्गावरही घुसणार.....

 
Tupkar
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. पोटात अन्नाचा कणही न घेतल्यामुळे रविकांत तुपकर यांची तब्येत आज प्रचंड खालावली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण ५० पेक्षा कमी झाल्याने तुपकर हाइपोग्लाइसीमियामुळे पुढच्या काही तासांत कोमात जाऊ शकतात असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारच्या वतीने काल, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रविकांत तुपकर यांच्याशी फोन वरून चर्चा केली, उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार नाहीच अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. दरम्यान आता हे आंदोलन चांगलेच चिघळण्याची चिन्हे असून शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. उद्या,८ सप्टेंबरला रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ राज्यात चक्काजाम आंदोलन होणार आहे, शिवाय समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सोयाबीन कापसाची दरवाढ, पिकविम्याची रक्कम, जंगली जनावरांपासून शेती पिकांचे रक्षण यासह विविध मुद्यांवर रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा वणवा आता गावागावात पेटत आहे. गावागावात प्रभातफेऱ्या, ग्रामसभांचे ठराव याद्वारे तुपकर यांच्या आंदोलनाला समर्थन वाढत आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तुपकर यांची प्रकृती अधिकच खालावत चालली आहे. तुपकर मागण्यांच्या लेखी आश्वासनांवर ठाम आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण ५० पेक्षा कमी झाल्याने तुपकर यांना 

हाइपोग्लाइसीमिया होण्याचा धोका वाढला आहे. ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यास रविकांत तुपकर पुढच्या काही तासांत कोमात जाऊ शकतात. 

मी शहीद व्हायला तयार..

माझी सरकारला एलर्जी असेल तर मला बाजूला करा. मी शहीद व्हायला तयार आहे,पण शेतकऱ्यांचं भलं करा, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, जोपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय होऊन लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जीव गेला तरी पोटात अन्नाचा कणही घेणार नाही म्हणजे नाहीच असे तुपकर यांनी ठणकावले आहे...